यवतमाळ – (प्रतिनिधी) – यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. शिवसेनेला हा यवतमाळ जिल्ह्यात खूप मोठा धक्का मानला जातो.मात्र त्यानंतर शिवसेनेने संजय राठोड यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. माजी राज्यमंत्री संजय देशमुख हे गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून मशाल हाती घेणार आहे. देशमुख यांच्या प्रवेशामुळे दारव्हा डिग्रस मतदारसंघात चुरस निर्माण होणार असून संजय राठोड यांना संजय देशमुख हे कडवे आव्हान देणार असल्याचं बोललं जात आहे.दारव्हा डिग्रस मतदारसंघात संजय विरुद्ध संजय अशी लढत पाहायला मिळू शकते.
शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी मागील महिन्यात संजय देशमुख यांच्यासोबत चर्चा केली होती.तेव्हापासून संजय देशमुख हे शिवसेना मध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या संजय देशमुख यांनी 1999 ते 2009 असे दहा वर्षे दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. दिग्रस मधील स्थानिक स्वराज्य संस्थेवर त्यांची मजबूत पकड आहे.1999 मध्ये शिवसेनेत असताना विधानसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे देशमुख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस देशमुख यांनी फक्त 125 मतांनी राष्ट्रवादीच्या ख्वाजा बॅग यांचा पराभव करून विधिमंडळात प्रवेश केला होता.
विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संजय देशमुख यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर 2004 मध्ये देशमुख अपक्ष म्हणून पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून गेले.मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीत संजय देशमुख यांचा संजय राठोड यांनी पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशमुख यांनी काँग्रेस मधून भाजपात प्रवेश केला होता. मात्र भाजप सेना युतीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी संजय राठोड यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.त्यावेळी त्यांना तब्बल 75 हजार मते मिळाली होती देशमुख यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातीलगणिते बदलण्याची शक्यता आहे.
.