हिंगोली (प्रतिनिधी) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा हिंगोली येथे आज आयोजित करण्यात आली आहे. सभेची जय्यत तयारी शिवसेना युबीटी कडून करण्यात येत असून शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे अनेक स्थानिक पदाधिकारी मैदानात उतरले असून सर्कलनिहाय बैठका घेऊन नागरिकांना सभेत येण्यासाठी आवाहन करत आहेत.
मात्र अनेक पदाधिकाऱ्यांनी 27 तारखेला सभा घेऊ नये, पावसाळ्याचे दिवस आहेत शेतकरी शेतात काम करत आहेत त्यामुळे सभेला नागरिक कमी येऊ शकतात अशी भीती व्यक्त करत सभा पुढे ढकलण्यासाठी विनंती केली होती. मात्र त्यानंतरही 27 ऑगस्टला सभा आयोजित करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांच्या बद्दल सामान्य शिवसैनिकात स्नेह आहे प्रेम आहे त्यामुळे शिवसैनिक सभेला तर येणारच त्यानंतरही आयोजकांच्या मनात गर्दी जमेल की नाही अशी भीती व्यक्त होत आहे अशी चर्चा आहे.
अशातच एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात सह संपर्कप्रमुख सुनील काळे आदि पदाधिकारी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक माजी आमदार तथा विद्यमान भाजपचे मोठे पदाधिकारी गजानन घुगे यांच्या घरी बसून चर्चा करत आहेत. गजानन घुगे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक जरी असले तरी सध्या भाजपमध्ये आहे आणि भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय मतभेद किती टोकाला आहे हे सर्वश्रुत आहे.
अशा परिस्थितीत सभेच्या एक दिवस आधी गजानन घुगे यांच्या घरी जाऊन चर्चा केल्यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी भाजपचे गजानन घुगे यांची तर मदत मागितली जात आहे का? सभेला गर्दी जमवण्यासाठी शिवसेनेचे नेते व पदाधिकारी भाजपच्या दारात गेले आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत तर चर्चा वेगवेगळी असले तरीही प्रत्यक्षात त्यांच्या चर्चा काय झाली हे गुलदस्त्यात आहे.
विनायक राऊत हे माझे गुरु त्यामुळे त्यांनी सदिच्छा भेट घेतली – गजानन घुगे
विनायक राऊत बबन थोरात सह इतर पदाधिकारी गजानन घुगे यांच्या घरी का गेले याबाबत आम्ही गजानन घुगे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आणि माझ्या घरी या नेत्यांचे येणे याचा काही एक संबंध नाही तर मी जुना शिवसैनिक आहे विनायक राऊत आणि माझा जुना स्नेह आहे आणि विनायक राऊत हे माझे गुरु आहेत त्यामुळे त्यांनी माझ्या घरी भेट दिली असल्याची प्रतिक्रिया गजानन घुगे यांनी दिली.
याप्रकरणी आम्ही हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क झाला नाही.