मुंबईः राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील सर्वोच्च बिंदू म्हणून आजच्या शेगावच्या (Shegaon) सभेकडे पाहिलं जातंय. काँग्रेस तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते येथे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मात्र दोन दिवसांपासून एका वेगळ्याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण चांगलंच पेटलंय. काँग्रेसव्यतिरिक्त पक्षांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. तर पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्यापुढे ‘माफीवीर’ असा मजकूर लिहिल बॅनरबाजी केल्याने पुण्यातलं वातावरणही तापण्याची चिन्ह आहेत.
राहुल गांधींचं वक्तव्य काय?
स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. वाशिम तसेच अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधींनी आपले आरोप अधिक स्पष्टपणे बोलून दाखवले. सावरकर हे ब्रिटिशांकडून पेंशन घेत होते. त्यांच्यासाठी काम करत होते. अकोल्यातील पत्रकार परिषदेत तर राहुल गांधींनी तर एक पत्र दाखवलं. ते सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलं होतं, असा दावा केला. मै आपका नौकर रहना चाहता हूं.. असं त्यात लिहिल्याचं राहुल गांधी म्हणालेत…
राहुल गांधींच्या याच वक्तव्यावरून भाजप, मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने निघाले आहेत. औरंगाबादमध्ये नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे उपस्थित आहेत. येथून मनसे कार्यकर्ते लवकरच शेगावच्या दिशेने निघणार आहेत. औरंगाबादहून निघालेल्या मनसे कार्यकर्त्यांना वाटेत पोलिसांकडून धरपकड होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवून मनसे निषेध नोंदवणार आहे.
शेगाव येथे दुपारी 3 वाजेच्या सुमारास राहुल गांधींची सभा होणार आहे. येथे मोठ्या संख्येने काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, कार्यकर्ते जमणार आहेत. जवळपास पाच लाखांची गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
तर मनसे, भाजप आक्रमक झाल्याने हाजरोंच्या संख्येने आंदोलनकर्तेही येथे जमा होत आहेत. ऐन थंडीत राजकीय वातावरण तापल्याने पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्था राखणाचे मोठे आव्हान आहे.