हिंगोली (प्रतिनिधी)- हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या वाळूची अवैध तस्करी, गुटखा विक्री, मटका व इतर अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी हिंगोली चे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. मात्र जिल्हा प्रशासन,पोलीस प्रशासन अवैध धंद्यावर थातूरमातूर कारवाई करत असल्याचा आरोप आमदार मुटकुळे यांनी करत जिल्हाधिकारी यांच्या दालनात शुक्रवारी कार्यकर्त्यांसोबत ठिय्या आंदोलन केलं.
जवळपास चार तास आमदार तानाजी मुटकुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकाऱ्यांसमोरच हे आंदोलन केल्यामुळे एकच भंबेरी उडाली. यावेळी आमदार मुटकुळे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले.
एकीकडे भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा आपसात मोठ्या प्रमाणावर बिनसलेले असताना हिंगोली जिल्ह्यात अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार डॉ संतोष टार्फे यांनी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आमदार मुटकुळे सोबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं. एकीकडे शिवसेना उबाठा आणि भाजपचे जमत नसल्याचे चित्र असतानाही विरोधी पक्षाचे दोन नेते एकत्र आल्यामुळे वेगळीच चर्चा ऐकायला मिळाली. अवैध धंदे बंद करण्याच्या मुद्द्यावर मी नेहमी सोबत येणार असल्याचे प्रतिक्रिया संतोष टार्फे यांनी प्रहार टीव्ही शी बोलताना व्यक्त केली.
चार तास चाललेल्या ठिय्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी आमदार तानाजी मुटकुळे यांना कारवाई करण्याचे आश्वासन दिले यानंतर 4 मार्च पर्यंत आपण हे आंदोलन स्थगित करत असल्याचं आमदार तानाजी मुटकुळे यांनी सांगितलं.