गोवा – इफ्फीत झळकला ग्रामीण संस्कृतीचे महत्त्व सांगणारा ‘ग्लोबल आडगाव’ चित्रपट

0
369

प्रतिनिधी :- ग्रामीण संस्कृतीचे महत्त्व सांगणारा ‘ग्लोबल आडगाव’ हा ६७२ कलाकारांचा समावेश असलेला भव्य मराठी चित्रपट काल ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला. भारत सरकारचा देशातील पहिला राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार प्राप्त केलेल्या मनोज रावसाहेब कदम यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून त्यांच्या या चित्रपटाला अमेरिकेच्या ‘न्यू जर्शी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट लेखनासाठीच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. अनिलकुमार साळवे यांनी या चित्रपटासाठीचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. अमृत मराठे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील वसमत चे रहिवासी असलेल्या सागर पतंगे हे प्रोडक्शन मॅनेजर असलेला चित्रपट साता समुद्र पार झळकत असून यामुळे हिंगोली जिल्ह्याचे नाव लौकिक होत आहे.

‘ग्लोबल आडगाव’ या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक पुरस्कार पटकावले असल्याने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेरसिकांनी मोठी गर्दी केली होती. या चित्रपटाला अजंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट साहाय्यक अभिनेता पुरस्कार, कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारासाठी नामांकन, तसेच उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.

या चित्रपटात रोनक लांडगे, अशोक कांगुडे, सिद्धी काळे यांच्या प्रमुख भूमिका असून दिग्ज कलाकार सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, अनिल नगरकर यांच्यासह ६७२ कलाकारांचा सहभाग आहे. सदरील चित्रपटाचे छायाचित्रण गिरिश जांभळीकर यांनी केलं असून प्रोडक्शन मॅनेजर म्हणून सागर पतंगे यांनी काम पाहिले आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटात ग्रामीण भागातील अनेक युवक-युवतींना काम करण्याची संधी देण्यात आल्याचे निर्माते मनोज कदम यांनी सांगितले.

शेतकरी पुत्र या नात्याने शेतकऱ्यांची कथा आणि व्यथा पडद्यावर आणायचा मी विचार केला आणि ‘ग्लोबल आडगाव’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात बारा बलुतेदारांना स्थान देण्यात येऊन भांडवलशाहीमुळे त्यांची होणारी कुचंबणा मांडण्यात आली आहे. कोविड काळातील असंख्य अडचणींना तोंड देत बीड, शिर्डी, नगर लोणावळा या ठिकाणी ६७२ कलाकारांचा लवाजमा घेऊन या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे असे मनोज कदम म्हणाले.

बकाल वाढत जाणारी सिमेंटची जंगले, मानवी मनाचे होत जाणारे शहरीकरण, स्मार्ट सिटी, मेट्रो राजधान्या, विमानाच्या वेगात येणारे विदेशी अर्थकारण, विकासाच्या नावावर गावांची आशा, अभिलाषा व ग्रामीण भाषेची होणारी कुर्तड आदी विषयासह साम्राज्यवादी भांडवली शक्तिविरोधात एका शेतकरी नायकाने दिलेला लढा या चित्रपटात मांडण्यात आल्याचे ते म्हणाले.

भारतीय प्राचीन संस्कृती संकटात शेतजमिनीवर वाढणाऱ्या प्रचंड उद्योगांमुळे भारतीय प्राचीन संस्कृती संकटात सापडली आहे. भांडवलशाहीच्या या युगात शहरी भागांसह आता खेड्यापाड्यांतही उद्योगधंदे येऊ लागल्याने ग्रामीण संस्कृती लोप पावत चालली आहे. हा प्रकार कुठेतरी थांबावा तसेच शेतजमीन, ग्रामीण संस्कृती, शेती, माती टिकावी याच उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केल्याचे निर्माते मनोज कदम यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा