हिंगोली -(प्रतिनिधी)- महाराष्ट्र मध्ये गोवंश हत्या बंदी कायदा आहे.या कायद्यान्वये कोणत्याही गोवंशाची कत्तल करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. मात्र त्यानंतरही मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करण्यासाठी अवैधरित्या व विनापरवाना गोवंश जनावरांची वाहतूक हे सर्रासपणे केली जात आहे.
हिंगोलीत मात्र पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने अवैधरित्या व विनापरवाना कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांच्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी धडक मोहीम राबवली जात आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये अवैधरित्या व विनापरवाना गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या विरुद्ध हिंगोली पोलीस धडक कारवाई करत आहे .1 जून ते 25 जून दरम्यान हिंगोली जिल्ह्यांमध्ये 13 गुन्ह्यांची नोंद तर 61 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 36 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदेशीर व नियमबाह्य वाहतुकीवर तसेच गोवंश जातीचे जनावरांचे कत्तल करण्यावर बंदी असून याप्रकरणी हिंगोली चे धडाकेबाज पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनामध्ये हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 25 जून असे 25 दिवसात स्थानिक गुन्हे शाखा व सर्व पोलीस स्टेशन यांचेकडून पेट्रोलिंग व नाकाबंदी दरम्यान असे विनापरवाना व नियमबाह्य तसेच कत्तली करीता वाहनांमध्ये गोवंश जातीचे जनावरे कोंबून त्यांची वाहतूक करीत असताना पकडण्यात आले आहे.
यामध्ये पोलीस स्टेशन वसमत शहर -2,पोलीस स्टेशन कळमनुरी -2,पोलीस स्टेशन गोरेगाव -2,पोलीस स्टेशन कुरुंदा -2,पोलीस स्टेशन बासांबा -1,पोलीस स्टेशन हिंगोली शहर -1,पोलीस स्टेशन बाळापुर -1,पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण -1,पोलीस स्टेशन हट्टा -1,असे एकूण 13 दखलपात्र व शिक्षा पात्र गुन्हे दाखल करण्यात आले असून नमूद गुन्ह्यातील गोवंश जातीचे जनावरांची सुटकाही करून 13 गुन्ह्यात एकूण 36 आरोपीं विरोधात कार्यवाही करण्यात आली असून सर्व गुन्ह्यात तब्बल 61 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोवंशच्या अवैध व विनापरवाना वाहतूक विरोधात पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनात सर्व पोलीस स्टेशन स्तरावर विशेष मोहीम घेण्यात आली .सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत 24 तास पोलिस अधिकारी व अंमलदार कर्तव्यावर असलेले एकूण सहा नाकाबंदीचे ठिकाण कार्यरत करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.