खाकीबाबा मठात ऐतिहासिक रथोत्सव संपन्न

0
489

हिंगोली(प्रतिनिधी) – ऐतिहासिक वारसा लाभलेल्या हिंगोली च्या खाकीबाबा मठात दरवर्षी प्रमाणे यावर्षी रामनवमीनिमित्त रथोत्सव साजरा करण्यात आला. साधारणत: ३५0 वर्षांपासूनची रथोत्सवाची परंपरा आजही कायम असून, या दिवशी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. या रथोत्सवासाठी खाकी बाबा मठ संस्थान चे महंत श्री कौशल्यादास महाराज यांनी विशेष तयारी केली होती. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा नववा दिवस आहे.



या तिथीस भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. म्हणून हा दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मठ, मंदिरामध्ये भजन, कीर्तन व प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन हा दिवस साजरा करण्यात येतो. हिंगोली येथे कयाधू नदी तीरावर वसलेल्या श्री १0८ खाकीबाबा उर्फ रामदास महाराजांच्या काळात मठाची निर्मिती झाली.

तेव्हापासून आजही येथे रामनवमीच्या दिवशी रथोत्सवाची परंपरा कायम असून, या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. मंदिराला तटबंदी भिंत असल्याने मठाचे संरक्षण झाले आहे. मठाच्या मध्यभागी राम, लक्ष्मण व सीतामातेची मूर्ती असलेले मुख्य मंदीर आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या खाकीबाबा मठामध्ये या दिवशी भाविक मोठय़ा उत्साहाने दर्शनासाठी आले. रामनवमीची तयारी आठ दिवस अगोदरपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून सुरू होते. यावेळी आठवडाभर मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. रथामध्ये प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती स्थापन करून मठाला पाच फेऱ्या मारल्या गेल्या, उपस्थित असलेले भाविक मोठ्या भक्ती भावाने दोरीने या रथाला ओढून या पाच परिक्रमा पूर्ण केल्या. हे दृश्य बघण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा