औरंगाबाद – (प्रतिनिधि ) हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथील सेवक गजानन जगताप हे १३ सप्टेंबर २०२२ रोजी मंदिराच्या पहिल्या माळ्यावर फाशी वर लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी गजानन जगताप यांचे भाऊ गोपाळ जगताप यांनी दिलेल्या फिर्यादी वरून नरसी नामदेव पोलीस ठाण्यात राजाभाऊ वेंकेटेशराव देशमुख, ललितादास भवानीदास देशपांडे,किरण किशनराव नरसीकर,आनंद पांडे यांच्या विरोधात १४ सप्टेंबर रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. आरोपींना मिळालेल्या जामीनविरोधात गोपाळ जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत आरोपींना मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणी केली. याबाबतची सुनावणी करत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने आदेश दिले आहे .उच्च न्यायालयाने आपल्या आठ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात लिहले कि तपासातील कागदपत्रांच्या अनुषंगाने असे दिसून येते की, प्रतिवादी-आरोपीविरुद्ध प्रथमदर्शनी, आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे घटक अस्तित्वात नाहीत. रेकॉर्डवरून पुढे असे दिसून येते की ट्रस्टच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य आणि माहिती देणार्याच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये बराच काळ वाद सुरू होता. 9 सप्टेंबर 2022 रोजी तहसील कार्यालयात एक बैठक बोलाविण्यात आली आणि त्या बैठकीत माहिती देणार्याने दाखल केलेल्या अर्जावर निर्णय घेण्यात आला. आणि त्याच्या भावाचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाईल. या बैठकीत कोणताही वाद किंवा भांडण झाले नाही.
सत्र न्यायालयाने या सर्व बाबींचा विचार करून प्रतिवादी-आरोपींच्या बाजूने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे तो बरोबरच आहे .
तपास जवळपास पूर्ण झाल्याचे दिसत असून नजीकच्या काळात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
या पैलूंचा विचार करत उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली आहे.
आरोपींतर्फे ऍड सचिन देशमुख, ऍड एस एस गंगाखेडकर यांनी काम पहिले .