अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आमदार रवी राणा यांची जीभ घसरली. “उद्धव ठाकरेंनी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे”, असा घणाघात रवी राणा यांनी केलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशीदेखील मागणी त्यांनी केलीय. रवी राणा यांच्या या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
“स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा दिली. देशावर प्रेम करणारे, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला समर्पित करणारे वीर सावरकर यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याचं शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं”, असा दावा रवी राणा यांनी केला.
“उद्धव ठाकरे देशविरोधी वक्तव्य करणारे राहुल गांधी यांना समर्थन करतात. उद्धव ठाकरे यांनी खरंतर चुल्लूभर पाणीमध्ये डुबून मरायला पाहिजे”, अशी टीका रवी राणा यांनी केली.
“राहुल गांधी अशाप्रकारचे वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे त्यांचं समर्थन करतात. त्यामुळे दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. ही माझी मागणी आहे”, असंदेखील ते म्हणाले.